Pain Mangement

सायटिका (Sciatica) बद्दलचे ४ मोठे गैरसमज आणि वस्तुस्थिती

सायटिका (Sciatica) बद्दलचे ४ मोठे गैरसमज आणि वस्तुस्थिती

आपण बऱ्याचदा लोकांकडून ऐकतो, “मला सायटिका झाला आहे, त्यामुळे चालता येत नाही, व्यायाम करता येत नाही. थोडे चालले की पायात मुंग्या येतात, बसावेसे वाटते किंवा वाकून व लंगडत चालावे लागते.” पाठीपासून पायापर्यंत पसरणाऱ्या या वेदनेबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. एका पायदुखी किंवा कंबरदुखीला थेट ‘सायटिका’ समजण्याची घाई केली जाते. आज आपण सायटिकाबद्दलच्या अशाच चार प्रमुख गैरसमजांमागील वैज्ञानिक सत्य समजून घेऊया.

गैरसमज १: कंबर आणि पायात दुखणाऱ्या प्रत्येक त्रासाला ‘सायटिका’ म्हणतात.

 वास्तविक स्थिती: सायटिका हा मूळ आजार नसून, तो एका विशिष्ट लक्षणाचे (Symptom) वर्णन आहे. कंबर किंवा पाठीच्या मणक्यातून (Spine) निघणाऱ्या सायटिक नसेवर (Sciatic Nerve) दाब आल्यामुळे हा त्रास होतो हे खरे आहे; परंतु पायाकडे जाणारी प्रत्येक वेदना सायटिकाच असते असे नाही.

 हे दुखणे आखडलेल्या स्नायूमुळे (Muscle stiffness), मणक्यातील सांध्यांची झीज झाल्यामुळे (Facet joint arthritis), किंवा कधीकधी खुब्याच्या (Hip joint) समस्येमुळेसुद्धा होऊ शकते. म्हणूनच, अशा दुखऱ्या लक्षणांचे अचूक निदान (Detailed Clinical Evaluation) करणे अत्यंत गरजेचे असते. योग्य तपासणी केल्यास वेदनेचे नेमके मूळ कारण शोधून त्यावर प्रभावी आणि अचूक उपचार करता येतात.

गैरसमज २: फक्त सक्तीची विश्रांती (Bed Rest) घेतल्याने सायटिका आपोआप बरा होतो.

 वास्तविक स्थिती: अनेकदा तीव्र वेदना सुरू झाल्यावर रुग्ण दिवसेंदिवस फक्त विश्रांती घेतात, पण दीर्घकाळ बेडरेस्ट हा यावरील योग्य उपाय नाही. उलट, शरीराची सक्रिय आणि योग्य हालचाल (Active lifestyle) असणे लवचिकतेसाठी फायदेशीर ठरते.

 जर वेदना तीव्र असतील किंवा बऱ्याच काळापासून पाठ व पायाचा त्रास होत असेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. मणक्याची स्थिती नेमकी पाहण्यासाठी डॉक्टर एमआरआय (MRI) तपासणी सुचवू शकतात. एमआरआयमुळे नसेवर आलेला दाब आणि त्याचे नेमके कारण स्पष्ट होते, ज्यामुळे योग्य उपचारांची दिशा ठरते.

गैरसमज ३: सायटिकेवर सर्जरी (ऑपरेशन) हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.

वास्तविक स्थिती: हा सर्वात मोठा गैरसमज आहे. सायटिकेच्या बहुतांश रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. आजच्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये अनेक विना-शस्त्रक्रिया (Non-surgical) पर्याय उपलब्ध आहेत.

 यातील एक अत्यंत प्रभावी उपचार म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन इंजेक्शन(Minimally Invasive Spine Injection). या प्रक्रियेमध्ये क्ष-किरणांच्या (X-ray Guidance) मदतीने नेमक्या बाधित भागावर औषध सोडले जाते, ज्यामुळे नसेवरील दाब आणि सूज कमी होते. ही एक ‘डे केअर’ (Day Care) पद्धत असून रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. या उपचारासाठी सक्तीच्या बेडरेस्टची गरज नसते आणि बऱ्याचदा मोठी शस्त्रक्रिया टळू शकते.

 कधी लागते सर्जरी? अतिशय दुर्मिळ प्रकरणांमध्ये, जर नसेवर तीव्र दाब येऊन पाय पूर्णपणे सुन्न पडत असतील किंवा पायाची ताकद वेगाने कमी होत असेल (उदा. फूट ड्रॉप), तरच तातडीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.

गैरसमज ४: सायटिका हा केवळ ज्येष्ठ नागरिकांचा आजार आहे.

वास्तविक स्थिती: हा आजार म्हातारपणातच होतो असा समज आहे, पण आजकाल तरुण वयातील लोकांमध्येही सायटिका मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

 तासणतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर चुकीच्या आसनात (Bad Posture) बसून काम करणे, किंवा जिममध्ये व्यायाम करताना चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे ही यामागची प्रमुख कारणे आहेत. वेळेवर योग्य उपचार घेतले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. तसेच, दैनंदिन जीवनात वर्क एर्गोनॉमिक्स (Work Ergonomics) पाळल्यास हा त्रास टाळता येऊ शकतो.

तज्ज्ञांचा सल्ला:

सायटिकाच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका किंवा वेदना वाढण्याची वाट पाहू नका. योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, अचूक निदान करा आणि वेदनामुक्त जीवनशैली जगा.